Ad will apear here
Next
अॅन अफेअर टू रिमेम्बर
अॅन अफेअर टू रिमेम्बर’ ही १९५७ सालची गाजलेली लव्ह स्टोरी. या सिनेमातल्या अनेक दृश्यांनी पुढे अनेक वर्षं अनेक सिनेमांना स्फूर्ती दिली. प्रवासातल्या एखाद्याशी अचानक होणारी भेट.... त्या ओळखीतून फुलणारी मैत्री.... त्या मैत्रीतून वाढणारा सहवास... आणि त्या सहवासातून जन्माला येणारं प्रेम!.... फार कमी लोकांच्या भाग्यात असे विलक्षण क्षण येतात. ‘सिनेसफर’मध्ये आज त्या सिनेमाबद्दल...
.......................

युरोपमधून अमेरिकेला जाणाऱ्या निकी फरान्टे (कॅरी ग्रांट) आणि टेरी मकेला (डेबोरा कर) नियतीच्या मनात काय आहे, याची कुठली कल्पना असायला? 

सिनेमाची सुरुवात होते ती वेगवेगळ्या ब्रॉडकास्टिंग चॅनेल्सच्या ब्रेकिंग न्यूजने! निकी फरान्टे हा एक रंगेल आणि गुलछबू तरुण. त्याने लॉइस क्लार्क (निव्हा पॅटरसन) या एका अब्जाधीश सुंदरीला गटवल्याची ब्रेकिंग न्यूज! निकी लॉइसला भेटायला युरोपमधून जहाजाने न्यूयॉर्कला निघालाय. टेरी मके ही एका नाइट क्लबमध्ये गाणारी; पण तिच्याही आयुष्यात केनेथ ब्रॅडली (रिचर्ड डेन्निंग) हा एक श्रीमंत माणूस आलाय. टेरीसुद्धा त्याच जहाजाने न्यूयॉर्कला केनेथला भेटायला निघाली आहे. 

पहिलाच सीन निकीच्या रंगेल स्वभावाची ओळख करून देणारा. बोटीवर त्याला पॅरिसहून गॅब्रिएलाचा फोन आलाय. अनेक तरुणींना त्याने प्रेमाचं नाटक करून फसवलंय, त्यातलीच ही एक. आपण त्याला सिगारेट केस भेट दिली तेव्हा त्याने दिलेल्या लग्नाच्या वचनाची आठवण ती त्याला करून देते. आपल्याला फसवून अमेरिकेला पळत असल्याबद्दल ती फोनवरून त्याला शिव्यांची लाखोली वाहत असतानाच तो लाइनमध्ये बिघाड असल्याचं नाटक करून फोन कट करतो.. तिथून बाहेर निघत असताना बोटीवरचा एक गृहस्थ त्याला आपल्या कुटुंबाबरोबर ब्रिज खेळण्याचं आमंत्रण देतो. ते नम्रपणे नाकारत निक त्याला म्हणतो, ‘I am sorry Mr. Hathway, but I cheat. It’s an addiction!’ मिस्टर हॅथवेला बुचकळ्यात टाकून तो निघत असतानाच त्याची भेट त्याचा लायटर हातात घेतलेल्या टेरीशी होते. बोलत बोलत तिच्या केबिनमध्ये शिरलेला निक तिला इम्प्रेस करत म्हणतो, ‘मला इतकं बोअर झालं होतं म्हणून सांगू. एकही सुंदर चेहरा दिसेना. मी म्हटलंसुद्धा स्वतःशी, की सुंदर चेहऱ्यांनी बोटींवरून प्रवास करणं बंदबिंद केलंय की काय? ...आणि तेवढ्यात तू दिसलीस! वाचलो बुवा!!’....त्याचा आविर्भाव पाहून हुशार टेरी त्याला बाजूला ठेवलेल्या आपल्या भावी नवऱ्याचा फोटो दाखवत त्याची माहिती देते... डेबोनेअर कॅरी ग्रांटचा आणि डेबोरा करचा हा प्रसंग मस्तच! त्याचं डिनरचं आमंत्रण स्वीकारून ती त्याच्याबरोबर जेवायला जातेदेखील. 

दुसऱ्या दिवशी बोलता बोलता टेरी त्याला आपल्या आयुष्याबद्दल सांगते. क्लबमध्ये गात असताना केनेथ कसा भेटला आणि त्याच्याशी लग्न करून ती पुढे कशी सुखी बायको होणार आहे वगैरे......टेरी – ‘Now my life is an open book’ निक त्यावर म्हणतो, ‘That’s only one page.’  त्यावर चटकन त्याच्या नजरेला नजर मिळवत ती म्हणते, ‘That’s the only page!’.... बोटीच्या डेकवरचा हा सीन दोघांच्यात उमलत चाललेल्या मैत्रीची सुरुवात करणारा.... निकच्या मागावर असणारा पापाराझ्झी त्यांचा फोटो काढायचा प्रयत्न करतो, तेव्हा निक त्याला मज्जाव करतो; पण नंतर तो लपून त्यांचा फोटो मिळवतोच. टेरी निकला समजावते, की त्याचं बोटीवर एकत्र दिसणं दोघांसाठीही योग्य नाही आणि त्यांनी खरं म्हणजे आपापल्या वेगळ्या मार्गाने जाणंच चांगलं. 

दुसऱ्या दिवशी दोघं ड्रिंक घेताना बारटेंडरसमोर त्यांची गाठ पडते तेव्हा निक म्हणतो, ‘जेवण्यासाठी माझं टेबल चेंज करून एकट्याचं घेतलंय’. टेरी सांगते, ‘मी ही तसंच केलंय.’ दरम्यान त्यांच्या मागावर असणारी मंडळी त्यांचं बोलणं चोरून ऐकण्यासाठी येतात. तेव्हा मात्र टेरी वैतागून तिथून निघते. (या सीनमधले डेबोरा करची एक्स्प्रेशन्स बघण्यालायक). आणि दोघं जेवणासाठी वेगवेगळ्या टेबलवर बसतात ते नेमके एकमेकांच्या पाठीमागेच. डायनिंग हॉलमध्ये जमलेली मंडळी त्यांना एकमेकांकडे पाठ करून बसलेले पाहून हसायला लागतात. टेरी बिचारी वैतागून जेवण टाकून निघून जाते.
 
नंतर स्विमिंग पूलमध्ये पुन्हा गाठ पडल्यावर निक तिला सांगतो, की बोट आता ज्या बंदराला थांबेल तिथे तो त्याच्या आजीला भेटायला जाणार आहे आणि तिने बरोबर यावं म्हणजे तिची आजीशी ओळख होईल. तो आजी वगैरे थाप मारतोय आणि प्रत्यक्षात तिथे त्याची कुणी मैत्रीणच असणार अशी पक्की खात्री बाळगून ती त्याचं आमंत्रण स्वीकारून त्याच्याबरोबर जाते. जाताना त्याने ‘सो कॉल्ड आजी’साठी घेतलेल्या प्रेझेंटवरून ती त्याची चेष्टाही करते; पण प्रत्यक्षात घरामागच्या छोट्या प्रार्थनामंदिरात निकची आजी भेटल्यावर तिचा संशय दूर होतो. आजीला ती निकची होणारी बायकोच वाटते; पण निक गैरसमज दूर करतो. टेरी प्रार्थनामंदिर बघण्यासाठी आत जाते. आजी निकलाही तिथे पिटाळते. अत्यंत तन्मयतेने ध्यानमग्न बसलेल्या टेरीकडे पाहून निकला तिचं कौतुक वाटतं आणि त्याच्या नजरेत तिच्याविषयी एक आत्मीयतासुद्धा दिसते. 

निकीच्या आजीबरोबर गप्पा मारताना टेरीला निकने काढलेली पेंटिंग्ज दिसतात. मग आजी निकच्या कलेचं कौतुक करत त्याच्या स्वतःमधल्या समीक्षकाने आणि टीकाकारानेच त्याच्यातल्या अस्सल कलाकाराला दाबून टाकल्याचं सांगते. त्याच्यातले सगळे सुप्त गुण बाहेर काढण्याचं काम तुझ्यासारखी कुणी गुणी मुलगीच करू शकेल, असंही आजी टेरीला म्हणते. त्याने केवळ आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर काढलेलं आजोबांचं पोर्ट्रेट तो आजीला भेट देतो. ते पाहून टेरी अवाक होते. आजीची भेट घेऊन निघताना आजी टेरीला आवडलेली पांढरी शाल एक दिवस तिला भेट म्हणून देण्याचं प्रॉमिस करते. चार पावलं पुढे गेलेली टेरी एका अनावर ओढीनं पुन्हा मागे वळून आजीजवळ येऊन तिला घट्ट मिठी मारते आणि निघते. 

त्या रात्री बोटीच्या डेकवर त्यांची भेट होते. टेरीचे डोळे पाणावलेले असतात. निकने घरी नेऊन एका अविस्मरणीय दिवसाची भेट दिल्याबद्दल टेरी त्याचे आभार मानते. डेकवर नीरव शांतता. दोघे हातात हात घालून फिरतायत. एका जिन्यावरून खाली उतरताना टेरी थबकते. दोघे जवळ येतात. खूप जवळ आणि रात्रीच्या त्या शांत धुंद वातावरणात दोघांची मिठी आणि चुंबन. दोघं जिना उतरतात. आपापल्या रूमकडे परतण्याची आणि एकमेकांपासून दूर जाण्याची वेळ. तिच्या डोळ्यात अश्रू. 
निक - ‘No more tears!’ 
टेरी (रडतच) - ‘I told you, that’s what beauty does to me!... We're headed into a rough sea, Nickie’ 
निक – ‘I know. We changed our course today’

अत्यंत जड अंतःकरणाने एकमेकांच्या हातात गुंतलेले हात सोडवून घेत दोघं निरोप घेतात. ‘आय मिस यू’ सांगण्यासाठी निक तिच्या रूमपाशी येतो. तिच्याकडूनही तेच ऐकताना त्याची बेचैनी आणखीच वाढते. कसाबसा तो आपल्या रूमवर परततो. दुसऱ्या दिवशी डेकच्या जिन्याशी तिला भेटल्यावर ताटातुटीच्या जाणीवेने दोघांची घालमेल आणखीच वाढलेली... ‘काही ठरवलंयस?’ त्याने विचारल्यावर तिने त्याला ‘नाही ...पण एका जागी थांबून बोलू नकोस...फिरत राहा’ असं सांगणं आणि त्याने ती एकेक पायरी चढेपर्यंत त्या शिडीभोवती फेऱ्या मारत पुन्हा ‘आय मिस यू’ म्हणणं आणि तिनेही त्याला तेच सांगत ‘आपण एकमेकांना फोन करू’ म्हणत त्याला ‘कीप मूव्हिंग’ म्हणणं..... आणि त्यानेही त्या शिडीभोवती गोल फिरत पुनःपुन्हा तिच्याजवळ बोलण्यासाठी येणं... आणि तो शिडीभोवती गोल फिरत असताना तिने त्याला, ‘आता थोडं उलटा गोल फिर, असं एकाच दिशेला फिरून तू चक्कर आणणारेस मला!’ म्हणत त्याला दटावणं - हा सीन फारच गोड घेतलाय!...

बोटीवरची शेवटची रात्र. त्यांना एक मोठाच धक्का बसतो जेव्हा त्यांना कळतं, की त्या पापाराझ्झीने त्यांच्या नकळत लपूनछपून त्यांचे एकत्र असतानाचे बरेच फोटो काढलेत आणि ते चक्क तो विकतोय बोटीवर. ते ऐकून दोघं क्षणभर बावरतात; पण त्या फोटोत खूप काही आक्षेपार्ह नाही असं एकमेकाला समजावून ती शेवटची रात्र बोटीवरची पार्टी एन्जॉय करण्यासाठी दोघं एकत्रच जातात. मधेच पार्टीहॉलमधून सटकून दोघं डेकवर जातात आणि एकमेकाच्या मिठीत मश्गुल होऊन त्या गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करतात. त्याच्या मिठीत असताना टेरीच्या तोंडून सहज उद्गार येतात-
टेरीहे संपूच नये..असंच चालू नाही कां राहू शकणार आयुष्यभर? 
निक - मी म्हटलं तसं कॅप्टनला, की फिरव बोट उलट्या दिशेला...पण तो लेकाचा ऐकायला तयार नाही...बहुतेक सगळ्याच प्रवाशांना उतरायचंय म्हणे न्यूयॉर्कला!
टेरी (खट्याळपणे) - हं..मी समजू शकते त्याचा प्रॉब्लेम.. या अथांग समुद्रावर फक्त दोघांसाठी बोट फिरवत राहायचं कायमच म्हणजे कठीणच नव्हे?! 
बोलताबोलता टेरी थांबते. गंभीर होते. निकला सोडून जाण्याची कल्पना जड जाते तिला. 
निकहं...उद्या सकाळी न्यूयॉर्क.....तो येईल तिथे तुला न्यायला?
टेरी मान डोलावते. ‘आणि....तुझी ती येईल तुला घ्यायला?’ ....निक होकारार्थी मान हलवतो.
टेरी -अशी कोणती गोष्ट असते जी आपलं आयुष्य कठीण करते?
निक -लोकं? (थोडं थांबून-) तू प्रेमात आहेस त्याच्या?
टेरी - आता नाही!...

दोघांना कळून चुकलंय, की आता दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. एकमेकांच्या सहवासातच त्यांना आयुष्यातला खरा आनंद मिळणार आहे. निक टेरीला सांगतो, की तिने त्याला सहा महिने द्यावेत ज्यात तो तिचा जीवनसाथी बनण्यालायक कर्तृत्व दाखवेल. टेरी त्यावर ‘सकाळी उत्तर देईन’ असं सांगून निघते.  

सकाळ उजाडते. न्यूयॉर्क बंदर समोर दिसायला लागतं. दोघे डेकवर भेटतात. प्रचंड उत्कंठा दोघांच्याही नजरेत. ती त्याच्या हातात एक कागद ठेवते. त्यात लिहिलेलं असतं, की बरोबर सहा महिन्यांनी एक जुलैला संध्याकाळी पाच वाजता ती त्याला भेटेल म्हणून. 
निक - पण कुठे?
टेरी - तूच सांग. मी येईन तिथे. 
त्याची नजर तेवढ्यात किनाऱ्याच्या दिशेने दिसणाऱ्या एम्पायर स्टेट बिल्डिंगकडे जाते. त्याच्या तोंडून शब्द जातात how about the top of the empire state building? आणि ती उद्गारते, oh that's perfect. It's the nearest thing to Heaven we have in New York City! ...

दोघांना न्यायला त्यांचे भावी पार्टनर्स आलेले असतात. दोघंही आपापल्या मार्गाने निघतात.
निकी लॉइसला घरी गेल्या गेल्या एंगेजमेंट मोडल्याचं सांगणार, तेवढ्यात टीव्हीवाले इंटरव्ह्यूसाठी कडमडतात.... त्याचा इंटरव्ह्यू घेणाऱ्याला निक आपण आता पुन्हा पेंटिंग्ज करणार असल्याचं सांगून लग्न सहा महिन्यांनंतर करू म्हणून सांगतो... त्याचा तो टीव्ही इंटरव्ह्यू उत्सुकतेने आणि विशेष रस घेऊन बघणाऱ्या टेरीविषयी केनेथला संशय येऊन तो तिला बोटीवर सहप्रवासी असलेल्या निकविषयी खोदून खोदून विचारतो आणि टेरीकडून त्याला ती निकच्या प्रेमात असल्याचं  कळतं.

आणि मग  पुढच्या घटना वेगाने घडत जातात. निक खरोखर कसून पेंटिंग्जमध्ये रस घेऊन पेंटिंग्ज करत सुटतो. आपल्या एका मित्राची पेंटिंग्ज विकण्यासाठी मदत घ्यायला सुरुवात करतो.  तिकडे टेरीसुद्धा मन लावून गाण्याच्या करिअरमध्ये बुडून जाते. पाहता पाहता सहा महिने उलटतात आणि एक जुलै उजाडतो. टेरी न्यूयॉर्कमध्ये येते. तिच्या नेहमीच्या दुकानात जाऊन एक ‘इर्रेझिस्टबल ड्रेस’ दाखवायला सांगते... दुकानातली एक बाई तेवढ्यात केनेथला फोन करून टेरी आल्याचं सांगते.. तो तिला भेटायला दुकानात येतो... पण ती आपण अत्यंत घाईत असल्याचं सांगून त्याला टाळून निघते... टॅक्सीतून उतरून ती एम्पायर स्टेट बिल्डिंगकडे बघत धावत सुटते आणि एक कार तिला उडवते...... 

तिकडे केव्हाचाच १०२व्या मजल्यावर पोचलेला निक टेरीची वाट बघत हैराण होऊन तिथेच येरझाऱ्या घालत असतो.... बिचाऱ्याला तिकडे खाली चालणारा गोंधळ कुठला कळायला आणि अंधुकसा येणारा अॅम्ब्युलन्सचा सायरन कुठचा कानात शिरायला? त्याची प्रिया त्याला भेटायला येताना वाटेतच जायबंदी होऊन तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय हे कुठचं कळायला...?  तो तिथेच तिची वाट बघत बसून राहतो...   

हॉस्पिटल बेडवर तळमळत निकच्या नावाचा धावा करणाऱ्या टेरीसमोर केनेथ मूकपणे बसलेला असतो... टेरी कदाचित कधीच चालू शकणार नसल्याचं डॉक्टर सांगतात... आपण बरे होऊन आपल्या पायावर उभे राहीपर्यंत निकला काही कळू द्यायचं नाही असं टेरी केनेथकडून वदवून घेते.... 

टेरी न आल्याने उद्ध्वस्त झालेल्या निकला आजी वारल्याचं कळतं. तो आजीच्या घरी जातो... आजीच्या घरी टेरीसह घालवलेले ते क्षण त्याला आठवतात... तिने जाताना टेरीसाठी ठेवलेली ती पांढरी शाल तिथे असते... निक ती शाल घेऊन परततो... चालू न शकणारी टेरी व्हीलचेअरवरूनच लहान मुलांना गाणी शिकवण्याचं काम सुरू करते... 

ख्रिसमसच्या दरम्यान लॉइस निकला घेऊन एका कार्यक्रमाला जाते.. कार्यक्रम संपल्यावर निघताना निक टेरीला केनेथबरोबर मागच्या रांगेत बघून थबकतो... तिच्या अस्फुट ‘हाय’ला प्रत्युत्तर न देता तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत तिथून निघतो.... केनेथ पुन्हा एकदा टेरीला विचारतो, ‘आता तरी निकला कल्पना देऊ या?’ पण टेरी पुन्हा एकदा त्याला आपली पांगळी अवस्था कळवू नकोस म्हणून अडवते... तिची घालमेल आपल्याला अस्वस्थ करून जाते... 
ख्रिसमसच्या संध्याकाळी टेरीचा पत्ता मिळवून निक तिच्या घरी जातो... टेरी कोचावर पाय घेऊन त्यावर पांघरून घेऊन बसली आहे... आणि सुरू होतो सिनेमाचा आपल्याला हेलावून टाकणारा क्लायमॅक्स!.... 

निकला घरी बघून आनंदलेली; पण आपली अवस्था त्याच्यापासून लपवावी कशी या कात्रीत सापडलेली टेरी. आणि टेरी पूर्वीसारखी का राहिली नाही अशा प्रश्नचिन्हात अडकलेला निक. त्यामुळे संभाषणाची सुरुवात अडखळती.... औपचारिक... एकमेकांचा अंदाज घेत....

मी इथे कसा पोहोचलो त्याचं तुला आश्चर्य वाटलं असेल?’
‘हो ना!’
‘मला एकदा मॅकबाय नाव टेलिफोन डिरेक्टरीतून शोधताना टीम मेकेरी नाव दिसलं. आणि मग वाटलं अरे ही टेरी मेके तर नसेल?’
‘हो ती मीच’
‘मग मी स्वतःशी म्हटलं अरे हे नाव तर आपल्या एका जुन्या मैत्रिणीसारखंच आहे, जिला मी एका विशिष्ट वेळी भेटण्याचं वचन दिलं होतं. पण मी वेळेवर पोहोचू शकलो नव्हतो...’
‘तू पोहोचू शकला नव्हतास त्या वेळी?’ 
‘हो ना. मग मी विचार केला, मला तिला भेटून तिची माफी मागितली पाहिजे. तुला पटतं ना, की एखाद्याने वेळ नाही पाळली तर त्याने माफी मागायला हवी?’
‘हो ना’..
‘मी विचार केला तू केवढी चिडली असशील माझ्यावर...’
‘हो ना खूपच चिडले होते...भडकलेच होते..’
‘किती वेळ वाट पाहिलीस माझी?’
‘हो.. खूप वेळ वाट पहिली....जवळजवळ...’
‘मध्यरात्रीपर्यंत?’
‘ओह...’
‘मग काय केलंस?’
‘मी चिडले... एकतर इतक्या उंचावर मी तिथे उभी..’
‘आणि तेही वादळात?..विजांच्या कडकडाटात?...पावसात?...आणि नंतर तुला वाटलं असेल मी एखादी चिठ्ठी तरी पाठवेन तुला?’...
‘पण पत्ता बदलला असेल तर?....’ 

निकच्या एकेक प्रश्नातून त्याने किती सोसलंय, ते कळून टेरीला आतून गदगदून आलंय.... जिव्हारी लागतंय.... पण बिचारी काहीही बोलू शकत नाहीये. कारण आपण पांगळे आहोत हे त्याला कळू द्यायचं नाही हा तिचाच हट्ट असतो... 

टेरीला एकेक प्रश्न विचारत विचारत - ती अशी कां वागली आणि का वागते आहे, याचं कारण कळू न शकल्याने हताश, निराश झालेला निक तिला आजीने देण्यासाठी ठेवलेली पांढरी शाल देतो आणि त्या शालीवरूनच त्याने काढलेल्या एका चित्राचा विषय निघतो... ती पांढरी शाल पांघरलेल्या मुलीचं चित्र त्याच्या मित्राकडून एका पांगळ्या मुलीने तितके पैसे नसल्याने खूप विनंती, आर्जवं करून मागून घेतल्याचं सांगतो आणि... आणि ते सांगता सांगता त्याच्या मनात शंका येते... इतका वेळ टेरी सोफ्यावरून उठली का बरं नाहीये?.... ती माझं चित्रं घेणारी पांगळी मुलगी टेरीच नसेल?... तो तिच्या बेडरूमचं दार उघडतो... तिथे समोरच त्याचं ते चित्र लावलेलं असतं आणि बाजूला एक व्हीलचेअर.... ओह.... त्याला सत्य उमगतं. तो येऊन टेरीच्या मिठीत कोसळतो.... दुरावलेले दोन प्रेमी जीव जवळ येतात कायम एकत्र राहण्यासाठी!...आणि तिचा अजरामर डायलॉग ‘If you can paint, I can walk... Anything can happen, don't you think?’...

सिम्पल लव्ह स्टोरी; पण कॅरी ग्रांटच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा ‘मस्ट सी’ म्हणावा लागेल.... आधीचा रंगेल प्रेमी आणि नंतर आपल्या सच्च्या प्रेमापासून ताटातूट झाल्यावरचं त्याचं वावरणं आणि संपूर्ण बोलणं... देहबोली... ग्रेटच!!

या सिनेमाची जवळजवळ सीन-टू-सीन कॉपी करत इंद्रकुमारने आमीर, मनीषा कोईराला, दीप्ती भटनागर आणि अनिल कपूरला घेऊन ‘मन’ नावाचा सिनेमा काढला होता, ही एक दुर्दैवी आठवण त्या निमित्ताने! पण लव्ह स्टोरीज आवडणाऱ्या प्रत्येकाने दिग्दर्शक लीओ मॅककेरीचा ‘अॅन अफेअर टू रिमेम्बर’ जरूर बघावाच असा!!!

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/YbA9uN या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZQDBH
Similar Posts
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी
कॅसाब्लांका अनेक विलक्षण गोड क्षणांनी भारून टाकणारं, रिक आणि इल्साच्या आगळ्या प्रेमाची कथा मांडणारं ‘कॅसाब्लांका’चं भूत एकदा मानगुटीवर बसलं की आयुष्यभर उतरत नाही... उपाय एकच असतो... निवांत सुट्टीचा दिवस गाठायचा आणि ‘कॅसाब्लांका’ची डीव्हीडी लावून त्यात हरवून जायचं... ‘सिनेसफर’मध्ये आज पाहू या त्याच सिनेमाविषयी..
दी ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय ब्रह्मदेशावर जपानचा कब्जा असतानाची १९४३ सालची ही कथा. रंगून आणि बँकॉकमध्ये रेल्वेचं दळणवळण सुरू होण्यासाठी आता केवळ क्वाय नदीवरच्या रेल्वेब्रिजचं काम राहिलंय आणि ते करण्यासाठी तिथल्या क्रूर जॅपनीज कर्नल साईटोने ब्रिटिश युद्धकैद्यांना कामाला जुंपायची योजना आखली आहे. एक अमेरिकन नेव्ही कमांडर तो ब्रिज उडवायची कामगिरी शिरावर घेतो
प्रेमपत्र फार नाही, तीन चार दशकांपूर्वीपर्यंत (कम्प्युटर आणि मोबाइल अस्तित्वात येण्याआधीच्या काळात), प्रेमात पडलेले दोन जीव एकेमकांना हाताने लिहून प्रेमपत्र पाठवत असत. अशाच एका प्रेमपत्राने केलेल्या घोटाळ्यामुळे झालेले गैरसमज आणि त्याच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या एका हळुवार प्रेमाची कथा सांगणारा दिग्दर्शक बिमल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language